सत्तावीसावा श्वास

FantasyHorrorMystery
Jul 31, 2026
Listen to storyNarrated by VITI
LightDark
0:00 / 0:00
Read this story in
Marathi

जर कधी रात्री पूर्ण शांततेत तुला स्वतःचा श्वास जास्त स्पष्ट ऐकू येऊ लागला... तर श्वास मोजू नकोस.

कारण काही गोष्टींना माणूस दिसत नाही... पण श्वास दिसतात.

माझं नाव किरण पाटील. वय एकतीस. मी स्वतःला नेहमी तर्कावर विश्वास ठेवणारा माणूस समजत आलो.

अंधश्रद्धा, भुतं, आत्मे, शाप... या सगळ्यावर मी कधीच विश्वास ठेवला नाही.

पण आज... माझ्या खोलीत मी एकटाच बसलो आहे.

तरीही......

"इथे दोन माणसं श्वास घेत आहेत"

.......

ह्याची सुरुवात तीन महिन्यांपूर्वी झाली. सांगलीला मी एका कामानिमित्ताने गेलो होतो. मला पुस्तक वाचण्याचा छंद असल्यामुळे माझं काम झाल्यावर नवीन पुस्तक घेण्यासाठी सांगलीच्या मार्केटमध्ये मी फेरफटका मारण्यासाठी गेलो. मी असाच फेरफटका मारत सांगलीच्या एका जुन्या भागात एका पुस्तकांचं दुकान दिसलं, मग मी सहज त्या दुकानात शिरलो.

दुकान खूप जुनं असल्यामुळे दुकानात वास होता—ओल्या कागदांचा, धुळीचा आणि खूप वर्षं बंद राहिलेल्या लाकडाचा.

सहज त्या दुकानात फेरफटका मारताना मला एका कोपऱ्यात काळ्या कापडात गुंडाळलेली एक वही ठेवलेली होती. तिच्यावर धूळ साचली होती.

माझी उत्सुकता दांडगी. खिडकीतून येणाऱ्या उजेडात मी ती वही उचलली आणि त्यावरील धुरळा झटकला आणि ती वही उघडणार तेवढ्यात दुकानदाराने ते पाहताच धावत येऊन माझा हात धरला.

त्याच्या हाताचा स्पर्श मला बर्फासारखा थंड जाणवत होता आणि त्याचे डोळे काहीतरी बोलत होते. एकदम घाबरलेले. आणि एका शांत स्वरात आणि जड आवाजात मला बोलला—

"ती उघडू नका."

मी हसलो आणि विचारलं,

"का?"

तो काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला. मग शांत आवाजात म्हणाला,

"कारण काही गोष्टी वाचल्या जात नाहीत... त्या वाचणाऱ्यालाच वाचायला लागतात."

मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि वही उघडली.

पहिल्या पानावर फक्त एकच ओळ होती.

"तू हे वाचत असशील... तर तुझ्या श्वासांची संख्या आधीच मोजली गेली आहे."

मी पान उलटलं तर काय, सगळी बाकीची पाने कोरी.....

हसलो. दुकानदाराला किंमत विचारून पैसे दिले. वही घरी आणली.

त्या रात्री मी पुण्याला उशिरा पोचलो. घरी पोहोचलो आणि ती वही काढून त्या रात्री मी ती कपाटात ठेवली...

आणि दुसऱ्या दिवशी सकाळी...

ती माझ्या उशाजवळ होती.

मी स्वतःला समजावलं.

"काल थकलो होतो. बहुतेक इथेच ठेवली असेल."

पण मनात एक छोटासा काटा रुतला.

त्या दिवसानंतर मला एक विचित्र सवय लागली.

मी नकळत श्वास मोजायला लागलो.

ऑफिसमध्ये...

गाडी चालवताना...

जेवत असताना...

अगदी लोकांशी बोलतानाही.

एक... दोन... तीन... सव्वीस...

आणि प्रत्येक वेळी "सत्तावीसावा श्वास" घेताना... माझ्या कानात अजून एका श्वासाचा आवाज यायचा.

तो माझ्या लयीमध्ये नसायचा.

तो माझ्या आधी श्वास घ्यायचा.

जणू... कोणीतरी माझ्यापेक्षा आधी माझा श्वास उचलत होता.

पहिल्यांदा मी तो योगायोग समजलो. परत तसंच झालं. दुसऱ्यांदा दुर्लक्ष केलं.

तिसऱ्यांदा... तसंच होताना मी आवाज रेकॉर्ड करायचं ठरवलं.

त्या दिवशी रात्री झोपताना मोबाईल बेडजवळ ठेवला. रेकॉर्डिंग सुरू केलं आणि रात्र निवांत झोपलो.

सकाळी उठल्यावर अगोदर मोबाईल हातात घेतला. मोबाईल अनलॉक केला. रेकॉर्डिंग चालू होतं. मग माझ्या लक्षात आलं आपण रात्री रेकॉर्डिंग कशासाठी लावलं होतं. मग ते सेव्ह केलं आणि ऐकलं.

पहिले दोन तास काहीच नव्हतं.

मग अचानक... रेकॉर्डिंगमध्ये माझ्या श्वासांचा आवाज सुरू झाला.

एक... दोन... तीन...

मी कधीच मोठ्याने मोजलं नव्हतं.

पण रेकॉर्डिंगमध्ये...

कोणीतरी माझ्यासाठी मोजत होतं.

"...पंचवीस..."

"...सव्वीस..."

क्षणभर शांतता.

मग... एक अगदी खोल, जड श्वास.

आणि कुजबुज...

"हा माझा."

माझ्या अंगावर काटा आला.

मी पुन्हा ऐकलं. तेच.

तिसऱ्यांदा तेच.

पण मी एक गोष्ट लक्षात घेतली. त्या आवाजानंतर...

माझ्या स्वतःच्या श्वासाचा आवाज एक सेकंदासाठी गायब होत होता.

जणू मी त्या एका सेकंदासाठी श्वास घेतच नव्हतो.

त्या दिवशी माझं कशात मन लागलं नव्हतं. की रात्री मी झोपू शकलो नाही.

संपूर्ण घर शांत होतं. असं वाटत होतं घड्याळाची टिकटिकही बंद आहे. फ्रिजचा आवाज नव्हता. बाहेर कुत्रीही भुंकत नव्हती.

जणू...

जगानेच श्वास रोखून धरला आहे की काय.

मी उठलो. हॉलमध्ये आलो. पाणी प्यायला ग्लास उचलला आणि अचानक... काचेच्या खिडकीत माझं प्रतिबिंब दिसलं.

मी थांबलो.

प्रतिबिंबही थांबलं.

मी हात वर केला.

प्रतिबिंबानेही केला.

सगळं ठीक होतं.

मी वळायला लागलो...

पण...

खिडकीतला मी "मी" अजूनही माझ्याकडेच पाहत उभा होता.

मी एका मिनिटासाठी गोठलो.

हळूहळू परत खिडकीकडे पाहिलं. आता प्रतिबिंब माझ्या हालचाली करत नव्हतं.

ते फक्त... माझ्या छातीकडे पाहत होतं.

मग त्याने... हळूहळू... स्वतःच्या ओठांवर बोट ठेवलं.

"श्श्श..."

मी मागे सरकलो. खिडकीकडे पुन्हा पाहिलं.

प्रतिबिंब गायब झालं होतं. फक्त माझा चेहरा दिसत होता.

मी स्वतःला समजावलं...

"भास आहेत."

पण त्याच क्षणी...

माझ्या कानाजवळ... कोणीतरी अगदी हळू आवाजात म्हणालं—

"तू अजूनही समजतोयस... श्वास तुझे आहेत?"

मी विजेच्या वेगाने मागे वळलो.

कोणीच नव्हतं.

पण...

हॉलच्या जमिनीवर धुळीत... ओल्या पावलांचे ठसे नव्हते... रक्ताचे ठसे नव्हते...

फक्त... श्वासाच्या वाफेसारखे २७ लहान पांढरे ठिपके होते.

पहिले २६ ठिपके माझ्याकडे येत होते.

सत्तावीसावा ठिपका... माझ्यापासून दूर जात होता.

आणि त्या ठिपक्याच्या मागे... कोणाच्याही पावलांशिवाय जमिनीवर धूळ स्वतःहून बाजूला सरकत होती.

जणू काहीतरी अदृश्य... माझा एक श्वास घेऊन घराबाहेर निघून गेलं आहे.

त्या रात्री मी झोपलो नाही.

सकाळ झाली. सूर्य उगवला. लोक रस्त्यावर फिरत होते. चहाच्या टपरीवर गप्पा सुरू होत्या.

सगळं अगदी नेहमीसारखं...

पण माझ्यासाठी काहीतरी कायमचं बदललं होतं.

मी चहा घ्यायला गेलो.

टपरीवाल्याने मला पाहिलं आणि हसला. पण त्याचं हसू क्षणात विरलं.

तो माझ्या छातीकडे पाहत राहिला.

"काय झालं?" मी विचारलं.

तो हळू आवाजात म्हणाला,

"साहेब... तुम्ही ठीक आहात ना?"

मी फक्त मानेने त्याला "हो" म्हटलं.

तो पुन्हा काही बोलला नाही. फक्त चहा देताना त्याचे हात थरथरत होते.

मी पैसे ठेवले.

तो म्हणाला,

"राहू द्या..."

मी विचारलं, "का?"

त्याने माझ्याकडे न बघताच उत्तर दिलं...

"ज्यांचा श्वास कमी होतो... त्यांच्याकडून पैसे घेत नाही."

मी काहीच बोललो नाही.

घरी परतलो. विचार करत सोफ्यावर बसलो.

विचार करताना मला ती वही दिसली आणि मी ती हातात घेतली.

पहिलं पान नेहमीसारखं. पण काळ्या वहीचं पुढचं पान उघडलं.

कालपर्यंत कोरं असलेलं पान... आता भरलं होतं.

लालसर अक्षरांनी.....

नियम – पहिला,

"सत्तावीसावा श्वास कधीही मोजू नकोस."

नियम – दुसरा,

"जेव्हा तुला दुसऱ्याचा श्वास ऐकू येईल... तेव्हा स्वतःचा श्वास रोखू नकोस."

नियम – तिसरा,

"जर तुझी सावली तुझ्यापेक्षा आधी थांबली... तर मागे वळून पाहू नकोस."

माझ्या कपाळावर घाम आला. ही अक्षरं मी पाहत असतानाच हळूहळू उमटत होती.

जणू शाई नव्हे... कोणाचातरी श्वास कागदावर गोठत होता.

त्या रात्री मी प्रयोग करायचं ठरवलं.

घरातील सगळे आरसे वर्तमानपत्राने झाकले.

खिडक्या बंद केल्या.

मोबाईल बंद केला.

आणि खोलीत एक मेणबत्ती लावली.

मी खुर्चीवर बसलो. डोळे मिटले. श्वास मोजायला सुरुवात केली.

एक... दोन... तीन......... पंचवीस... सव्वीस...

मी थांबलो.

"आज सत्तावीसावा श्वास मोजायचाच नाही."

माझ्या ओठांवर हलकंसं हसू आलं.

"खेळ संपला."

पण...

तेवढ्यात... माझ्या समोर... कोणीतरी पुढे मोजलं.

"...सत्तावीस"

मी डोळे उघडले.

खोली रिकामी.

पण... मेणबत्तीची ज्योत हळूहळू माझ्याकडे वळली.

वारा नव्हता.

तरीही ती सरळ माझ्या चेहऱ्याकडे पाहत होती.

आणि मग... ती विझली.

पूर्ण अंधार.

त्या अंधारात...

पहिल्यांदाच मला समजलं...

"अंधारालाही श्वास असतो."

तो थंड नव्हता.

गरमही नव्हता.

तो... जिवंत होता.

माझ्या सभोवताली... कोणीतरी खूप हळू श्वास घेत होतं.

एक नाही.

दोन नाही.

डझनभर.

सगळे वेगवेगळ्या लयीने.

जणू खोली माणसांनी भरली होती.

पण... कोणीच दिसत नव्हतं.

अचानक... एका लहान मुलाचा आवाज आला,

"आई..."

लगेच दुसरा आवाज... एका म्हाताऱ्या माणसाचा,

"मला घरी जायचंय..."

तिसरा... एका स्त्रीचा,

"माझा श्वास परत दे..."

माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की मला वाटलं ते फुटेल.

मी धावत लाईट लावला.

खोली रिकामी.

पण... भिंतीवर... धुळीत... कोणीतरी बोटाने लिहिलं होतं—

"ते अजूनही श्वास घेत आहेत."

मी मागे सरकलो.

आणि त्याच क्षणी... माझा फोन स्वतःहून सुरू झाला.

त्यावर कोणाचाही नंबर नव्हता. फक्त एक काळी स्क्रीन.

मग... स्क्रीनवर हळूहळू पांढरी अक्षरं उमटली,

"तुझ्याकडे अजून ३४७ सत्तावीसावे श्वास उरले आहेत."

त्याखाली... आणखी एक ओळ,

"प्रत्येक वेळी आम्ही जवळ येतो."

मी घाबरून फोन भिंतीवर आपटला.

स्क्रीन फुटली. फोन बंद झाला.

पण... फुटलेल्या काचेत...

माझा चेहरा दिसत नव्हता.

तिथे दुसरा कुणीतरी होता.

त्याला डोळे नव्हते, नाक नव्हतं, तोंड नव्हतं.

फक्त...

त्याची छाती वर-खाली होत होती.

आणि प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या छातीत वेदना वाढत होती.

त्या रात्री झोपण्याआधी... मी शेवटचा एकदा वही उघडली.

या वेळी... पानावर फक्त एकच वाक्य होतं.

"तुला वाटतं आम्ही तुझे श्वास घेतो..."

मी पुढची ओळ वाचली... आणि माझ्या हातातून वही खाली पडली.

कारण त्यावर लिहिलं होतं—

"नाही किरण... आम्ही तुझ्या श्वासात राहतो."

त्याच क्षणी माझ्या अगदी कानाजवळ पहिल्यांदाच कोणीतरी माझ्याच आवाजात एक खोल श्वास घेतला.

मी श्वास घेतला नव्हता.

मग... तो कोण होता?

त्या रात्री मला झोप लागली नाही.

पहाटे पाचच्या सुमारास खिडकीबाहेर पक्ष्यांचा आवाज यायला हवा होता. पण त्या दिवशी एकही पक्षी ओरडला नाही.

संपूर्ण परिसरात एक विचित्र शांतता होती.

इतकी शांत की मला स्वतःच्या पापण्या मिटण्याचाही आवाज ऐकू येत होता.

मी बाथरूममध्ये जाऊन नळ सुरू केला.

पाणी हातावर पडलं. मी चेहरा धुतला आणि आरशात पाहिलं.

यावेळी आरशात मी होतो.

पण...

माझ्या तोंडातून निघणारा श्वास दिसत नव्हता.

थंड सकाळ होती. काच धूसर व्हायला हवी होती.

पण आरशावर धुकं जमा होत होतं.

माझ्या मागे उभ्या असलेल्या कोणाच्यातरी श्वासाने.

मी मागे वळलो.

पण कोणीच नव्हतं.

पुन्हा आरशात पाहिलं तर धुक्यावर एक ओळ उमटली.

"तू अजून आम्हाला पाहू शकत नाहीस."

मी हात फिरवून धुकं पुसलं. काच स्वच्छ झाली.

पण ती ओळ काचेच्या आतून पुन्हा बाहेर आली.

त्या दिवशी मी ठरवलं—या वहीचा इतिहास शोधायचा.

मी पुन्हा सांगलीला आलो आणि सांगलीच्या जुन्या जिल्हा वाचनालयात मी पोहोचलो.

धुळीने माखलेल्या नोंदी, पिवळे पडलेले कागद, मोडकळीस आलेल्या फाईली.

ग्रंथपाल एक ऐंशी वर्षांचा म्हातारा होता.

मी त्याच्यासमोर ती वही ठेवली.

त्याचा चेहरा क्षणात पांढरा पडला.

त्याने वहीला हातही लावला नाही.

फक्त विचारलं...

"तू अजून श्वास घेतोयस?"

मी चिडून म्हणालो,

"हा कसला प्रश्न आहे?"

तो शांतपणे म्हणाला,

"कारण ही वही ज्या लोकांकडे गेली... त्यांच्याबद्दल नंतर एकच गोष्ट लिहिली गेली."

त्याने कपाटातून एक नोंदवही काढली.

त्यात पंधरा नावे होती.

प्रत्येक नावासमोर एकच तारीख आणि मृत्यूच्या कारणाच्या जागी...

"श्वास परत मिळाला नाही."

माझ्या अंगावर काटा आला.

"याचा अर्थ काय?"

म्हातारा काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला—

"तुला 'रिकामे लोक' माहीत आहेत?"

मी नाही म्हणून मान डोलावली आणि विचारलं,

"कोण?"

"ते चालतात, बोलतात, हसतात... पण ते श्वास घेत नाहीत."

मी हसलो.

"हे अशक्य आहे."

तोही हसला. पण त्याच्या डोळ्यांत हसू नव्हतं.

"आज रात्री... बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी... सरळ आरशात बघ."

मी म्हणालो, "का?"

"कारण त्या वेळी ते स्वतःचा चेहरा विसरतात."

मी हा विचार करत पुण्याला परत आलो. आणि मोबाईलवर १२:२७ चा अलार्म लावून आरशासमोर उभा राहिलो.

हृदय धडधडत होतं.

घड्याळाने १२:२७ दाखवलं.

सुरुवातीला काहीच घडलं नाही.

एक मिनिट.

दोन मिनिटं.

मी स्वतःवरच हसायला लागलो.

"सगळं वेड आहे."

तेवढ्यात... आरशात माझ्या चेहऱ्याची त्वचा हलू लागली.

जणू पाण्यावरचं प्रतिबिंब.

माझे डोळे विरघळले. नाक नाहीसं झालं. ओठ मिटले.

आणि काही सेकंदांत...

माझ्या चेहऱ्याच्या जागी एक गुळगुळीत काळा पृष्ठभाग दिसू लागला.

मी किंचाळत मागे पडलो.

पण... आरशातला "मी" पडला नाही.

तो तसाच उभा राहिला.

मग त्याने पहिल्यांदाच बोलायला सुरुवात केली.

पण त्याला तोंड नव्हतं.

आवाज माझ्या छातीतून येत होता.

"तुला वाटतं तू आम्हाला शोधतोयस... प्रत्यक्षात... खरं तर आम्ही तुला जन्मल्यापासून ऐकत आहोत."

माझ्या श्वासाचा वेग वाढला.

मी आरशावर हात आपटला.

काच फुटली.

हजारो तुकडे जमिनीवर विखुरले.

पण प्रत्येक तुकड्यात एक वेगळा चेहरा दिसत होता.

एक म्हातारा.

एक लहान मुलगी.

एक सैनिक.

एक गर्भवती स्त्री.

एक कैदी.

एक साधू.

शेकडो चेहरे.

आणि सगळे एकाच लयीने श्वास घेत होते.

आणि अचानक... सर्वांनी एकाच वेळी माझ्याकडे पाहिलं.

आणि एकाच आवाजात कुजबुजले—

"तुझा सत्तावीसावा श्वास... पहिल्यांदा आज नाही घेतला गेला. तो... तुझ्या जन्माच्या रात्रीच घेतला गेला होता."

माझ्या हातातून रक्त गळत होतं.

पण त्या रक्ताचा रंग लाल नव्हता.

तो राखाडी होता.

मी थिजून त्याकडे पाहत राहिलो.

कारण रक्त जमिनीवर पडत नव्हतं.

ते... हवेतच विरघळत होतं.

आणि प्रत्येक थेंब विरघळताना मला एखाद्या अनोळखी माणसाचा एक खोल श्वास ऐकू येत होता.

रक्ताचा तो राखाडी थेंब हवेत विरघळला...

आणि माझ्या डोक्यात असा आवाज घुमला, जणू शेकडो लोक एकाच वेळी हळूच श्वास सोडत होते.

मी डोळे घट्ट मिटले.

आवाज थांबला.

डोळे उघडले...

मी माझ्या खोलीत नव्हतो.

मी एका जुन्या घरात उभा होतो.

भिंती चुन्याच्या. छप्पर काळवंडलेलं. जुन्या कंदिलाचा मंद पिवळा प्रकाश. हवा धुळीने भरलेली.

समोर लाकडी पाळणा हळूहळू हलत होता.

पण... त्याला कोणी हात लावत नव्हतं.

मी पाळण्याजवळ गेलो.

आत एक नवजात बाळ झोपलेलं होतं.

त्याचा श्वास अगदी मंद होता.

मी त्याचा चेहरा पाहिला आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली.

कारण ते बाळ... मीच होतो.

"हे अशक्य आहे..."

मी कुजबुजलो.

तेवढ्यात मागून एका स्त्रीचा आवाज आला.

"उचलू नकोस."

मी वळलो.

एक म्हातारी उभी होती.

तिचे केस पूर्ण पांढरे. पण तिचे डोळे....

डोळे नव्हतेच. फक्त दोन काळे खोलगट खड्डे.

ती म्हणाली,

"तो अजून पहिला श्वास घेतलेला नाही."

मी घड्याळाकडे पाहिलं.

भिंतीवरचं जुनं घड्याळ... थांबलं होतं.

त्याच्या काट्यांनी १२:२७ दाखवलं होतं.

"मी कुठे आहे?"

ती म्हणाली,

"जिथे प्रत्येक श्वास आधी लिहिला जातो."

तेवढ्यात... घराच्या बाहेरून आवाज आला.

तो पावलांचा नव्हता.

ना वाऱ्याचा.

तो...

श्वासांचा होता.

शेकडो. हजारो.

जणू संपूर्ण गाव घराबाहेर उभं राहून एकाच लयीने श्वास घेत होतं.

म्हातारीने पाळण्यावर काळं कापड टाकलं.

"तो येतोय."

"कोण?"

तिने उत्तर दिलं नाही.

फक्त माझ्याकडे पाहून म्हणाली—

"किरण... जर त्याने बाळाचा पहिला श्वास घेतला... तर हा जन्म त्याचा होईल."

माझ्या अंगावर काटा आला.

दार हळूहळू उघडलं.

कोणी आत आलं नाही.

पण... खोलीतील हवा बदलली.

मेणबत्तीची ज्योत विझली नाही.

तरी तिचा प्रकाश काळा झाला.

मी आयुष्यात पहिल्यांदाच... काळा प्रकाश पाहत होतो.

तो प्रकाश अंधारासारखा नव्हता.

तो... सगळे रंग गिळत होता.

त्या काळ्या प्रकाशात... मला तो दिसला नाही...

त्याचं शरीर दिसलं नाही.

फक्त त्याच्या जाण्याचा परिणाम दिसत होता.

तो ज्या दिशेने सरकत होता, त्या दिशेचा आवाज गायब होत होता.

लाकडाचा वास नाहीसा होत होता.

भिंतींचा रंग फिका पडत होता.

जणू अस्तित्वच पुसलं जात होतं.

तो पाळण्याजवळ थांबला.

बाळ झोपलेलं होतं.

त्याने बाळाला स्पर्श केला नाही.

फक्त...

एक खोल श्वास घेतला.

त्या क्षणी पाळण्यातलं बाळ थरथरलं.

त्याच्या ओठांतून एक छोटासा श्वास बाहेर पडला.

पण तो बाळाच्या तोंडात परत गेला नाही.

तो हवेत थांबला आणि हळूहळू... त्या अदृश्य अस्तित्वाकडे वळला.

"नाही!"

मी धावत पुढे गेलो.

मी तो श्वास पकडायचा प्रयत्न केला.

माझा हात त्यातून आरपार गेला.

मग पहिल्यांदाच... त्या अस्तित्वाने माझ्याकडे पाहिलं.

त्याला चेहरा नव्हता.

तरीही... मला खात्री होती... तो माझ्याकडेच पाहत होता.

अचानक... माझ्या कानात माझ्या आईचा आवाज घुमला.

"किरण..."

मग बाबांचा,

"घाबरू नको."

मग माझ्या शाळेतील मित्राचा.

मग शिक्षकांचा.

मग...

असं वाटलं... माझ्या आयुष्यात ज्यांना मी कधी भेटलो, त्या प्रत्येकाचा आवाज त्याच्यातून येत होता.

मला तेव्हा समजलं. तो त्यांचे आवाज नक्कल करत नव्हता.

त्याने ते श्वासासोबत जपून ठेवले होते.

तो पुन्हा एक खोल श्वास घेतला आणि पाळण्यातलं बाळ रडणंच विसरलं.

म्हातारी रडत म्हणाली—

"पहिला गेला..."

मी तिच्याकडे पाहिलं.

"काय?"

ती कुजबुजली...

"प्रत्येक माणसाचा पहिला श्वास जन्म देतो..."

"पण सत्तावीसावा श्वास... मालक ठरवतो."

त्या क्षणी... सगळं घर हादरलं.

भिंतींना भेगा पडल्या. कंदील फुटला आणि मी जोरात खाली कोसळलो.

मी पुन्हा माझ्या खोलीत होतो. जमिनीवर पडलेला.

श्वास धापा टाकत.

पण... माझ्या समोरची काळी वही...

उघडी होती.

त्यात आजपर्यंत नसलेलं एक नवीन पान दिसत होतं.

त्यावर फक्त एकच ओळ होती... मोठ्या अक्षरांत.

"तुझा जन्म झाला त्या रात्री... आम्ही एक चूक केली."

खाली...

पहिल्यांदाच... एक नाव लिहिलेलं होतं.

ते नाव पाहताच...

माझ्या छातीतला श्वास अडखळला.

कारण ते नाव होतं...

"किरण पाटील – योग्य मालक नाही."

त्या रात्री मला झोप लागली नाही.

पण यावेळी कारण भीती नव्हती.

कारण मला प्रत्येक श्वासाबरोबर... दुसऱ्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते.

ते माझ्या छातीत नव्हते.

ते...

माझ्या श्वासाच्या आत धडधडत होते.

सकाळी उठल्यावर मला पहिली विचित्र गोष्ट दिसली.

माझ्या बेडरूमच्या भिंतीवर... कोणीतरी नखांनी काढल्यासारख्या २७ उभ्या रेघा होत्या.

मी बोट लावलं. त्या रंगाच्या नव्हत्या. त्या भिंतीत कोरलेल्या होत्या.

पण...

मी त्यांना मोजायला सुरुवात केली.

एक... दोन... सव्वीस...

सत्तावीस.

सत्तावीसावी रेघ स्पर्श करताच... संपूर्ण भिंत...

एक दीर्घ श्वास घेत असल्यासारखी फुगली.

मग हळूहळू परत बसली.

मी मागे उडी मारली.

भिंत पुन्हा शांत झाली.

जणू काहीच घडलं नव्हतं.

मी ती काळी वही उघडली.

पहिल्यांदाच... त्यात अक्षरं माझ्या डोळ्यांसमोर बदलू लागली.

"चूक जन्मात झाली नव्हती..."

अक्षरं विरघळली. पुन्हा उमटली.

"चूक... नावात झाली होती."

मी पान उलटलं.

तेथे... एक जन्मनोंद होती. पिवळसर कागद.

त्यावर दोन नावे होती.

पहिलं... किरण पाटील.

दुसरं... पूर्णपणे काळ्या शाईने खोडलेलं.

पण... मी जितका वेळ त्या काळ्या डागाकडे पाहत होतो तितका तो हलत होता.

जणू... तो डाग नव्हता.

कोणाचातरी बंद डोळा होता.

अचानक... माझा मोबाईल वाजला.

स्क्रीनवर "आई"

मी थरथरत्या हाताने फोन उचलला.

"हॅलो?"

दुसऱ्या बाजूला काही सेकंद शांतता.

मग आईचा आवाज.

पण...

तिच्या श्वासाचा आवाज नव्हता.

आईला दम्याचा त्रास होता. ती बोलताना नेहमी थोडी धाप लागत असे.

आज ती एकदाही श्वास घेत नव्हती.

"किरण..."

"आई?"

"घरी येऊ नकोस."

मी म्हणालो, "का?"

"कारण..."

फोनवर अचानक खूप खोल श्वास ऐकू आला.

मग आईच्या आवाजात पण पूर्णपणे वेगळ्या स्वरात... एक वाक्य ऐकू आलं.

"आम्ही आधीच तुझ्या घरात आहोत."

आणि फोन कट झाला.

मी गावाकडे निघालो.

रस्त्यात पाऊस सुरू झाला.

वायपर चालू होते.

पण काचेवर पडणारे प्रत्येक पावसाचे थेंब...

श्वासासारखे धूसर गोल बनवत होते.

सिग्नलला गाडी थांबली.

माझ्या बाजूला एक बस येऊन उभी राहिली.

मी सहज आत पाहिलं.

संपूर्ण बस भरलेली होती.

सगळे प्रवासी माझ्याकडेच पाहत होते.

एकही जण बोलत नव्हता.

एकही जण मोबाईल वापरत नव्हता.

एकही जण डोळे मिचकावत नव्हता.

फक्त... सगळ्यांच्या छात्या...

एकाच वेळी वर-खाली होत होत्या,

"एकाच श्वासात".

सिग्नल हिरवा झाला. मी पुढे निघालो.

आरशात मागे पाहिलं तर बस नव्हती.

रिकामा रस्ता.

गावी पोहोचल्यावर... आई दारात उभी होती.

ती रडत मला मिठी मारायला आली.

पण... मी थांबलो.

कारण...

तिच्या मिठीत मला शरीराची ऊब जाणवली नाही.

फक्त... एक थंड श्वास.

मी हळूच विचारलं.

"आई... तुला माझं नाव आठवतं?"

ती लगेच म्हणाली,

"किरण."

"माझा वाढदिवस?"

ती शांत झाली.

"तुझं वय?"

ती शांत.

"मी लहान असताना माझी आवडती गोष्ट?"

ती माझ्याकडे पाहत राहिली.

मग... तिने हसून उत्तर दिलं.

"हे प्रश्न तुझी आई उत्तर देईल."

माझ्या अंगावर काटा आला.

"म्हणजे... तू कोण?"

ती काही बोलली नाही.

फक्त... पहिल्यांदाच... तिच्या ओठांतून काळसर धूर बाहेर पडला.

धूर नव्हता.

तो... श्वास होता.

मी घरात पळत शिरलो.

आजोबांची जुनी पेटी उघडली.

त्यात एक पत्र होतं.

ते माझ्या नावाने होतं.

"प्रिय किरण..."

पत्रात लिहिलं होतं—

"जर हे पत्र तुझ्या हातात आलं असेल तर समज... त्यांनी तुला शोधलं आहे. तुझा जन्म योगायोग नव्हता. तुझ्या जन्माच्या रात्री दवाखान्यात दोन मुलं जन्माला आली होती. एक तू.... आणि दुसरं... ज्याने पहिला श्वास घेतलाच नव्हता. तो मेला नाही. तो श्वासाशिवाय जागा झाला. आणि त्या रात्री... कोणीतरी त्याला तुझा सत्तावीसावा श्वास दिला."

माझे हात थरथरू लागले.

पत्राचं शेवटचं पान उघडलं.

तेथे आजोबांनी शेवटची ओळ लिहिली होती—

"जर कधी तुला तुझ्यासारखाच दुसरा किरण दिसला... तर त्याच्याशी बोलू नकोस. कारण तो तुझी जागा घ्यायला आलेला नसेल... तो ती परत न्यायला आलेला असेल."

मी पत्र खाली ठेवलं.

हळूहळू वर पाहिलं.

समोरच्या खिडकीबाहेर... पावसात... एक माणूस उभा होता.

तो पूर्ण भिजला होता.

त्याचा चेहरा.... माझ्यासारखाच होता.

अगदी डोळे, नाक, सगळं.

त्याने हळूच हात वर केला.

आणि... खिडकीवर बोटाने एकच आकडा लिहिला.

२७

मग... त्याने खोल श्वास घेतला.

त्याच क्षणी... माझ्या छातीतला श्वास अर्धवट थांबला.

आणि मला पहिल्यांदाच जाणवलं... तो माझ्याकडे बघत नव्हता.

तो... माझ्यात बघत होता.

त्या माणसाने खिडकीवर लिहिलेला "२७" पावसाच्या थेंबांनी धुऊन गेला...

पण काचेवर त्याची बोटांची खुण राहिली.

ती खुण साधी नव्हती.

ती आतून धडधडत होती.

जणू काचेखाली एखादी नाडी धावत होती.

मी दार उघडून बाहेर पळालो.

पाऊस कोसळत होता.

रस्ता रिकामा होता.

तो माणूस गायब झाला होता.

पण चिखलात पावलांचे ठसे नव्हते.

त्याऐवजी... प्रत्येक दोन फूटांवर जमिनीवर धुक्याचे गोलाकार डाग होते.

जणू... तो चालला नव्हता... तो प्रत्येक श्वासाबरोबर पुढे सरकत होता.

त्या रात्री मी घराच्या मागच्या खोलीत गेलो.

आजोबांनी ती खोली नेहमी बंद ठेवली होती.

दरवाजा उघडताच... एक कुबट, ओलसर वास नाकात शिरला.

आत फक्त तीन गोष्टी होत्या.

एक जुना आरसा, एक लाकडी खुर्ची आणि भिंतीवर कोरलेला एकच शब्द...

"पाहू नकोस."

आरशावर काळं कापड टाकलेलं होतं.

माझे हात थरथरत होते.

आजोबांनी तो का झाकून ठेवला असेल?

मी हळूहळू कापड बाजूला केलं.

आरशात माझं प्रतिबिंब दिसलं.

मी निःश्वास सोडला.

"मीच आहे..."

मग...

आरशातला मी हसला.

पण... मी हसलो नव्हतो.

तो आरशातला किरण माझ्याकडे पाहत राहिला.

त्याने ओठ हलवले.

आवाज आला नाही.

पण मला त्याचे शब्द स्पष्ट समजले.

"तू खूप उशीर केलास."

माझ्या पायाखालची जमीन थंड झाली.

मी मागे सरकलो.

खरं तर तोही मागे सरकला नाही.

तो अजून जवळ आला.

जणू... आरशाच्या आतून.

मी आरशाच्या खालच्या भागाकडे पाहिलं आणि माझ्या अंगातलं रक्त गोठलं.

त्याला सावली नव्हती.

प्रतिबिंब होतं, प्रकाश होता.

पण... त्याच्या पायाखाली सावली त्याची नव्हती.

माझी होती.

तो पुन्हा हसला.

यावेळी आवाज आला.

पण... तो माझ्या कानात नव्हता.

तो... माझ्या फुफ्फुसांच्या आतून आला.

"किरण... तू प्रत्येक सत्तावीसावा श्वास मोजलास..."

"पण तू एक गोष्ट कधी मोजली नाहीस."

मी कुजबुजलो,

"काय?"

तो शांत झाला.

मग त्याने स्वतःच्या छातीवर हात ठेवला.

"तुझ्या आयुष्यात किती श्वास तुझे होते?"

माझं हृदय धडधडू लागलं.

मी आरशावर मुठ मारली.

काचेला तडा गेला.

पण... त्या तड्यातून रक्त नाही... धूर बाहेर आला.

तो धूर छताला लागला...

आणि संपूर्ण खोलीत श्वासांचा आवाज घुमू लागला.

एक... दोन... दहा... शंभर... हजार...

वेगवेगळे श्वास.

लहान मुलांचे.

म्हाताऱ्यांचे.

स्त्रियांचे.

सैनिकांचे.

रडणाऱ्यांचे.

मरताना धापा टाकणाऱ्यांचे.

सगळे... एकाच वेळी.

आणि अचानक... सगळे आवाज थांबले.

पूर्ण शांतता.

आणि त्या शांततेत... एकच आवाज.

माझाच.

"किरण..."

मी वळलो.

खोलीच्या कोपऱ्यात...

आणखी एक मी उभा होतो.

मग दुसरा...

तिसरा....

चौथा.....

पाचवा....

संपूर्ण खोली... माझ्याच चेहऱ्यांनी भरली होती.

पण प्रत्येकाच्या डोळ्यांत वेगवेगळ्या भावना होत्या.

एक रडत होता.

एक हसत होता.

एक रागाने पाहत होता.

एकाचा चेहरा पूर्ण रिकामा होता.

त्यांपैकी एक पुढे आला.

त्याने माझ्या कानाजवळ येऊन कुजबुजलं—

"आम्ही तुझे भविष्य नाही..."

दुसरा म्हणाला—

"आम्ही तुझे भूतकाळ नाही..."

तिसरा हसला.

"आम्ही ते किरण आहोत..."

"जे प्रत्येक वेळी सत्तावीसाव्या श्वासानंतर जन्माला आले..."

माझा श्वास अडखळला.

"म्हणजे... मी कोण?"

सगळे एकाच वेळी हसले.

आणि म्हणाले—

"हा प्रश्न आम्हीही विचारला होता."

तेवढ्यात... जुनं घड्याळ... जे अनेक वर्षांपासून बंद होतं...

पहिल्यांदाच चालू झालं.

टक... टक... टक...

प्रत्येक टिकटिकेसोबत... माझ्या छातीतला श्वास कमी होत होता.

मी धापा टाकू लागलो.

आरशातला किरण पुढे आला.

त्याने माझ्याकडे हात पुढे केला.

त्याचा हात थंड नव्हता.

उबदारही नव्हता.

त्यात... श्वासच नव्हता.

तो म्हणाला—

"एकच श्वास उरलाय."

"तो तू घेशील..."

"की मी?"

आणि...

खोलीतील सगळे किरण... एकाच वेळी... श्वास घेण्यासाठी पुढे झेपावले.

आणि आरसा फुटला...

आवाज झाला आणि मी पडलो.

आणि माझी शुद्ध हरपली.

मी शुद्धीवर आलो तर मी माझ्या बेडरूममध्ये होतो.

तो झालेला आवाज काचेचा नव्हता.

तो... माझ्या छातीतून तडा गेल्याचा होता.

मी खाली पाहिलं.

माझ्या शरीराला काही झालं नव्हतं.

पण... मी श्वास घेत होतो...

आणि छाती हलत नव्हती.

पहिल्यांदाच मला समजलं...

मी श्वास ऐकत होतो.

पण तो घेत नव्हता.

समोर उभा असलेला दुसरा किरण हळूहळू हसला.

तो मागे फिरला. दार उघडलं आणि घराबाहेर निघून गेला.

मी त्याच्या मागे धावलो.

दारापाशी पोहोचलो...

पण माझा हात दारातून आरपार गेला.

मी दार उघडू शकत नव्हतो.

कारण... मी आता त्या घरात नव्हतो.

मी... त्या घराच्या आठवणीत होतो.

बाहेर आईचा आवाज आला.

"किरण, चहा ठेवला आहे."

दुसरा किरण उत्तरला,

"येतो."

बाबा हसले.

कुत्रा त्याच्या मागे धावत गेला.

सगळं अगदी नेहमीसारखं होतं.

फक्त... त्या घरात माझ्याशिवाय प्रत्येकाला तोच खरा वाटत होता.

मी आरशात पाहिलं.

आरशात एक खोली होती.

त्या खोलीत... शेकडो लोक उभे होते.

लहान मुलं.

म्हातारे.

तरुण.

स्त्रिया.

सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव—वाट पाहण्याचा.

त्यांपैकी एकाने माझ्याकडे पाहून विचारलं,

"तूही नवीन आहेस?"

मी काही बोलू शकलो नाही.

तो शांतपणे म्हणाला,

"काळजी करू नकोस..."

"सुरुवातीला सगळ्यांनाच वाटतं..."

"...आपण अजून जिवंत आहोत."

तेवढ्यात... आरशाच्या पलीकडून एक लहान मुलगा आला.

त्याच्या हातात काळी वही होती.

त्याने ती उघडली.

पानं स्वतःहून उलटू लागली.

शेवटच्या पानावर... माझं नाव नव्हतं.

तुमचंही नव्हतं.

तिथे फक्त एक रिकामी ओळ होती.

मुलाने वर पाहिलं.

हसला.

आणि विचारलं—

"पुढचं नाव... कोणाचं लिहू?"

त्याने पेन कागदावर टेकवलं.

पण लिहिलं नाही.

Join the Discussion